'चोरीला गेलेली बस' सापडली - Marathi News 24taas.com

'चोरीला गेलेली बस' सापडली

www.24taas.com, नाशिक
 
नाशिकच्या महामार्ग बसस्थानकावरून शुक्रवारी मध्यरात्री चोरीला गेलेली बस सापडली. नाशिकपासून दीडशे किलोमीटर अंतरावरील शेवगाव गावात ही बस आढळली. या घटनेने पुन्हा एकदा एसटीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
 
शहरातील मुंबई आणि शिर्डीच्या प्रवाशांसाठी असलेल्या या महामार्ग बसस्थानकावर रात्री मुक्कामी येणा-या बसची पार्किंग असते. इथूनच शुक्रवारी रात्री जव्हार आगाराची जव्हार-नाशिक बस चोरीला गेली. एमएच १२ इएफ ६१०८ या क्रमांकाची ही बस होती. चालक बस स्थानकाच्या विश्रामगृहात मुक्कामाला होता. सकाळी ७.३० च्या सुमारास चालक बस घेण्यासाठी आला असता बस गायब होती.
 
नाशिकमध्ये सर्वत्र शोध घेऊन आणि चोविस तास उलटूनही बस न मिळाल्यानं सरकारवाड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. जिल्ह्यातील सर्व पोलीस कंट्रोल रुमला माहिती देण्यात आली. शेजारच्या जिल्ह्यात तपास सुरु असताना शेवगाव परिसरात म्हणजेच नाशिकपासून तब्बल चार तासांच्या अंतरावर ही बस सापडली. बस पळवणारा आरोपी फरार आहे.
 
बस पळवून नेण्याच्या अनेक घटना राज्यात घडल्यात तरीही प्रशासनाला जाग येत नाही. विनाचाव्यांच्या बसेस, चालकांची आरामाची व्यवस्था, स्थानकाची सुरक्षा अशा अनेक बाबी या प्रकरणामुळे समोर आल्यात. आता तरी प्रशासनानं गंभीरतेने लक्ष देऊन सुधारणा करण्याची गरज आहे.

First Published: Sunday, June 17, 2012, 18:56


comments powered by Disqus