हॉस्पिटलचं दुर्लक्ष, बाळाचा जन्मतःच मृत्यू - Marathi News 24taas.com

हॉस्पिटलचं दुर्लक्ष, बाळाचा जन्मतःच मृत्यू

www.24taas.com, नाशिक
 
केवळ डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका बाळाचा जन्मतःच मृत्यू झालाय. नाशिक महापालिकेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेला वेदना होत असताना, तिला उपचारच मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय़.
 
नाशिक शहरातल्या पंचवटी या मध्यवर्ती परिसरात इंदिरा गांधी रुग्णालय आहे. महापलिकेच्या या रुग्णालयात दाखल गर्भवती महिलेची प्रसूती जवळ आली, तरी तिच्या मदतीला नर्सशिवाय कोणीही आलंच नाही. एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. हॉस्पिटल प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच तिच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला. अखेर नातेवाईकांनी गोंधळ घालत संपूर्ण रुग्णालय डोक्यावर घेतलं.
ही परिस्थिती फक्त एकाच रुग्णालयात नाही तर नाशिक रोडचं बिटको रुग्णालय, कथडा रुग्णालय, या सगळ्या रुग्णालयांमध्ये हीच अवस्था आहे. तात्पुरत्या मानधनावर वैद्यकीय अधिकारी काम करतायत, त्यांचं खाजगी प्रॅक्टिसकडेच जास्त लक्ष असल्याचा आरोप होतोय. या घटनेनंतर तीन जणांना निलंबित करण्यात आलंय.
 
सर्वसामान्यांच्या या रुग्णालयात गर्भवती महिलांची होणारी होरपळ अक्षम्य आहे.  नागरिकांच्या करातून चालवली जाणारी ही रुग्णालयंच मृत्यू शय्येवर आहेत, त्यामुळे तिथे दाखल झालेसा माणूस कसा काय बरा होणार, असा प्रश्न नाशिककरांना पडलाय.
 

First Published: Monday, June 18, 2012, 22:52


comments powered by Disqus