बिबट्यांना पकडण्यासाठी आता रेस्क्यू व्हॅन - Marathi News 24taas.com

बिबट्यांना पकडण्यासाठी आता रेस्क्यू व्हॅन

www.24taas.com, नाशिक
 
मानवी वस्तीत शिरणा-या नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नाशिक वनविभागाच्या दिमतीला आता रेस्क्यू व्हॅन देण्यात आली आहे. शहरात आणि ग्रामीण भागातल्या वस्त्यांमध्ये बिबट्यांची वाढती घुसखोरी वनविभागासाठी आव्हान ठरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरू शकते असा दावा वनविभागानं केलाय.
 
शहरीकरणामुळे मानवी वस्ती वाढू लागली आणि सिमेंटचं जंगल प्राण्यांच्या वस्तीत अतिक्रमण करू लागलं. परिणामी, वन्यजीवांचा मानवी वस्तीत अधिकाधिक संचार होऊ लागला. नाशिक शहरात तर अलिकडे बिबट्या मानवी वस्तीत येणं त्यानं लोकांवर हल्ले करणं हे वारंवार घडू लागलंय. त्यातही चिंतेची बाब म्हणजे हे बिबटे त्वरीत जेरबंद करण्यात वनविभागाला येणारं अपयश... म्हणून आता वनविभागाच्या मदतीला आता अद्ययावत यंत्रणांनी सज्ज असणारी रेस्क्यू व्हॅन देण्यात आलीय. यात सर्च लाईट, मेगाफोन, सायरन बसवण्यात आलेत. पिंजरे घेऊन येणारे टेंपो, ट्रक छोट्या गल्ल्यांमधून नेताना अडचणी येतात त्यामुळे ही स्पेशल डिझाईनची रेस्क्यू व्हॅन तयार करण्यात आलीय.
 
या व्हॅनमुळे वेळेची बचत होणार असली तरी काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. मुख्यत: बिबट्या पकडण्यासाठी परवानगी मिळायला लागणारा विलंब कधी कमी होणार ? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. मुळातच वनविभागाकडे कर्मचा-यांची कमतरता असते. जे काही कर्मचारी वनविभागाकडे आहेत त्या सर्वांनाच उपलब्ध सामग्री कशी वापरावी याबाबत फारसं उपयुक्त ज्ञान नाही. त्यामुळे अद्ययावत यंत्रणा वापरताना प्रशिक्षण देणंही गरजेचं आहे.

First Published: Saturday, June 30, 2012, 19:47


comments powered by Disqus