Last Updated: Monday, July 30, 2012, 16:10
www.24taas.com, नाशिक 
मुलींवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असाच प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. सातवर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. एका नाल्यात सातवर्षीय बालिकेचा मृतदेह सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या बालिकेवर बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सातवर्षीय बालिका रात्री घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. तिच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोध घेतला असता ती सापडली नाही. रविवारी सकाळी एका गुराख्यास जोशी फार्मजवळील नाल्यामध्ये एक बालिका चिखलात विवस्त्रावस्थेत पडलेली आढळून आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. वैद्यकीय अहवालामध्ये मुलीवर बलात्कार करून गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांची व बहिणीची अधिक चौकशी केली असता रात्री योगेश खाडे हा सायंकाळी घरी आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी योगेशला ताब्यात घेतले असून तो सराईत गुन्हेगार असल्याची नोंद पोलिसांत आहे.
First Published: Monday, July 30, 2012, 16:10