Last Updated: Thursday, August 9, 2012, 08:35
www.24taas.com, नाशिक पुण्यात साखळी बॉम्ब झाल्यानंतर राज्यभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. त्यातूनच नाशिक शहरात पोलिसांनी बैठकांचं सत्र सुरू केलंय. सुरक्षेच्या दृष्टीनं विविध संस्थांना सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना पोलीस करत आहेत. पण गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या घोषणेचं काय झालं, असा सवाल आता नाशिककर करत आहेत.
पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुरक्षेचा आढावा घेणारी बैठक सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी बैठकांचा धडाका लावलाय. बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भातल्या सूचना केल्या जातायत. मॉल्समध्ये भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेतला जातोय. महापालिकेसह सर्व आस्थापनांनी सीसीटीव्ही बसवावेत, यासाठी सूचना केल्या जातायत. आधी आवाहन, मग सूचना आणि नंतर सीसीटीव्ही बंधनकारक करण्याची ताकीदही देण्यात येतेय.
खरं तर नाशिकच्या मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवले जातील, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच केली होती. पंधरा दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आलेल्या गृहराज्यमंत्र्यांनी पुन्हा सीसीटीव्हींची घोषणा करुन नाशिककरांची निरोप घेतला. मात्र या घोषणा हवेतच विरल्या आणि आता पुण्यात स्फोट होताच पोलीस पुन्हा सीसीटीव्हीची सक्ती करु लागले. आस्थापनांना सीसीटीव्हींची सक्ती करताना पोलीस शहर सुरक्षेच्या जबाबदारीतून सुटका करुन घेत असल्याचा आरोप होतोय.
पुणे बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था आणि खबरदारीच्या यंत्रणा किती तुटपुंज्या आहेत, हे समोर आलंय. तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाणारी नाशिक नगरी पर्यटनाच्या दृष्टीनंही महत्त्वाची आहे. त्यामुळे आता तरी धडा घ्यावा आणि सीसीटीव्ही फक्त कागदावर किंवा घोषणांपुरते न उरता प्रत्यक्षात बसवले जावेत, अशी नाशिककरांची अपेक्षा आहे.
First Published: Thursday, August 9, 2012, 08:35