मातृत्वावर आघात, प्रॉपर्टीसाठी गर्भपात - Marathi News 24taas.com

मातृत्वावर आघात, प्रॉपर्टीसाठी गर्भपात

झी २४ तास वेब टीम, जळगाव
 
प्रॉपर्टीतील वाटेकरी वाढतील म्हणून एका क्रूर पतीने त्याच्या पत्नीला गर्भपात करायला भाग पाडल्याची घटना जळगावमध्ये घडलीये. विशेष म्हणजे ही महिला पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेली असता पोलिसांनीही तिची तक्रार घ्यायला नकार दिला तर हे सर्व कायदेशीर पद्धतीनेच केल्याचा अजब दावा डॉक्टरांनी केलाय.
 
जयश्री उर्फ रत्ना पाटील हिचा विवाह पाचोला  तालुक्यातील खडकदेवळा गावच्या गरबड पाटीलशी झाला. विशेष म्हणजे गरबड पाटीलला पहिल्या पत्नीपासून ३ अपत्य आहेत.  जेव्हा दुसरी पत्नी म्हणजेच जयश्री गरोदर राहिली, तेव्हा त्याने गर्भपात करण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला. एवढंच नाही, तर चार महिन्यांची गरोदर असताना तिचा गर्भपात करून तिला कधीच मुल होऊ नये, यासाठी डॉक्टरांकडे जाऊन बळजबरीनं ऑपरेशनही करण्यात आलं. पाचोरा पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली मात्र पोलिसांनी तक्रारीची काहीच दखल न घेतल्याचा आरोप जयश्रीच्या कुटुंबियांनी केलाय.
 
गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. जळगावच्या लाठी हॉस्पिटलमध्ये जयश्रीचा गर्भपात करण्यात आला. मात्र, ऑपरेशनची सर्व प्रक्रिया कायदेशीरपणे केल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. प्रॉपर्टीमध्ये जादा वाटेकरी नको, यासाठी दबाव आणून, मारहाण करून गर्भपात करण्यास भाग पाडल्याची ही घटना स्त्रीत्वाची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल. त्यामुळं दोषींवर पोलीस कधी आणि काय कारवाई करणार हेच पहायचं.

First Published: Tuesday, December 20, 2011, 16:38


comments powered by Disqus