Last Updated: Saturday, December 24, 2011, 20:38
झी २४ तास वेब टीम, नाशिक कोणतीही पूर्वसुचना न देता नाशिक महापालिका प्रशासनानं नोकर भरतीची लेखी परीक्षा रद्द केली. त्यामुळं नाशिकमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या हजारो उमेदवारांचा भ्रमनिरास झाला. महापौरांनी भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्यानंतर त्याबद्दल उमेदवारांना साधी माहितीही देण्याची तसदी मनपा प्रशासनानं घेतली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.
नाशिक महापालिकेच्या नोकर भरतीसाठीची लेखी परीक्षा होणार होती. यासाठी हजारो उमेदवार लेखी पेपर लिहण्यासाठी परीक्षा केंद्रावर आले होते. मात्र परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर परीक्षा रद्द झाल्याचं उमेदवारांना सांगण्यात आलं होतं. लेखी परीक्षा रद्द झाल्याची कोणतीच पूर्वसुचना न दिल्यानं उमेदवारांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. नाशिक मनपा भरती प्रक्रियेत अनेक त्रुटी आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महासभेत झालेल्या वादळी चर्चेनंतर भरती प्रक्रियेवर तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
परीक्षा रद्द करण्याआधीच परीक्षार्थींना परीक्षेचे कॉल लेटर पाठवण्यात आलं होतं, परीक्षा रद्द झाल्यावर या परीक्षार्थींना कळवण्याचे महानगरपालिकेने कष्ट घेतले नाही, त्यामुळंच परीक्षार्थींचा लोंढा परीक्षा केंद्रांवर पोहोचला. परीक्षा रद्द झाल्याचं कळाल्यावर परीक्षार्थींनी प्रचंड गोंधळ घातला. नुकसान भरपाईसह पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे..
First Published: Saturday, December 24, 2011, 20:38