छगन भुजबळ जाणार दिल्लीच्या राजकारणात - Marathi News 24taas.com

छगन भुजबळ जाणार दिल्लीच्या राजकारणात

झी २४ तास वेब टीम, नाशिक
 
राष्ट्रवादीचे बडे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राच्या राजकारणात जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यासोबतच येत्या मनपा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे, आघाडी बाबतच्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
 
नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीनं भरघोस यश मिळवलं आहे. जिल्ह्यातील ६ पैकी ४ पालिकांमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्यामुळे येत्या मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी वेगळी चूल मांडणार अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, नाशिकवर राष्ट्रवादीची पकड मजबूत करणारे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसनंही राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ केंद्राच्या राजकारणात जाण्याची चर्चा होती. भुजबळांनीही एका कार्यक्रमात तसे संकेत दिले. नाशिक लोकसभा मतदारसंघात एक उमेदवार दुसऱ्यांदा निवडून येत नाही असा इतिहास आहे. त्यामुळे पुतणे समीर भुजबळ यांना राज्याच्या राजकारणात पाठवून, भुजबळ स्वत: लोकसभेची निवडणूक लढवतात का याची चर्चा सुरु झाली आहे.

First Published: Thursday, December 29, 2011, 23:06


comments powered by Disqus