सावकारीचा पाश महिलेच्या जीवावर - Marathi News 24taas.com

सावकारीचा पाश महिलेच्या जीवावर

झी २४ तास वेब टीम,  बीड
बीड शहरात एका महिलेनं खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. रुपाली देशपांडे असं या महिलेचं नाव आहे.
 
बीड शहरामध्ये या महिलेचं मळीवेस भागात दुकान होतं. तीन वर्षांपूर्वी दुकानासाठी तिनं एक लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र, एक लाखाला एक हजार रुपये रोज या प्रमाणं घेतलेलं कर्ज 40 लाखांपर्यंत गेलं. त्यामुळं सावकार वसुलीसाठी त्रास देऊ लागले.यामुळं त्रस्त झालेल्या महिलेनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याआधीही या महिलेनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
 
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिनं 9 सावकारांची नावं लिहिली असून या सावकारांमुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं तिनं लिहून ठेवलं होतं. सचिन कुलकर्णी, बंडू पिंगळे, सचिन लोढा,संतोष टाक, तबरेज, दिनेश परिहार, महेश हजारे, राऊत, आणि मामू अशी या सावकारांची नावं आहेत. पोलिसांनी मात्र, या महिलेचा जबाब घेतल्याशिवाय गुन्हा दाखल करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. महिलेवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
बीडमध्ये गेल्या चार-सहा महिन्यांपासून खासगी सावकारीचा पाश जास्त आवळला जातोय. विशेष म्हणजे हा खाजगी सावकारीचा पैसा मटका, क्लब, पत्ते या दोन नंबरच्या धंद्यांमधून येत असून त्याला काही पोलिसांचा आशीर्वाद असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं सावकार टक्क्यानं पैसे देण्याऐवजी दिवसांवर पैसे देताएत. त्यामुळे अशा घटना घडत आहेत.

First Published: Wednesday, October 19, 2011, 14:04


comments powered by Disqus