कुंपणचं शेत खातंय... - Marathi News 24taas.com

कुंपणचं शेत खातंय...

www.24taas.com, नाशिक
 
पेट्रोल भेसळीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात जळीतकांडंही घडली. पण पेट्रोल भेसळीसाठी जबाबदार आहे ती पेट्रोल कंपन्यांपासून ते पेट्रोल पंपांपर्यंत पेट्रोल पोहोचवण्याची सडलेली व्यवस्था. नाशिकजवळच्या पेट्रोल कंपनीच्या डेपोमध्येच कमी पेट्रोल भरलं जात असल्याचं उघड झालं आहे.
 
पानेवाडी टर्मिनलमधला एचपी कंपनीचा डेपोमधून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये इंधन वितरित केलं जातं. टँकर्समधल्या इंधनाची वैधमापन विभागानं अचानक तपासणी केली असता हे इंधन कमी असल्याचं आढळून आलं. यासंदर्भात कंपनीला नोटीस देण्यात आली आहे. तर ४ लाख ६६ हजार ८३० रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या डेपोमधून दररोज दोन लाख लीटर पेट्रोल बारा जिल्ह्यांमध्ये पाठवलं जातं.
 
मुळात इंधन कंपन्या कमी इंधन पाठवतात आणि टँकर्सचाही गैरव्यवहार यामुळे मोठी हेराफेरी होते आहे. यशवंत सोनावणे जळीत कांडानंतर इंधन भेसळीचं भयाण वास्तव तीव्रतेनं समोर आलं होतं. मुळात इंधन कंपन्यांनीच कमी इंधन दिलं, त्यात टँकरचालकांनीही इंधन चोरलं तर पेट्रोल पंपावर सहाजिकच कमी पेट्रोल पोहोचतं आणि त्यामुळेच भेसळीचे प्रकार वाढतात. यामध्ये वरपासून खालपर्यंत सगळ्यांचेच हात गुंतलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड उपटून टाकणं अत्यंत गरजेचं झालं आहे.
 
 

First Published: Tuesday, January 24, 2012, 00:05


comments powered by Disqus