टोल की लूटमार? - Marathi News 24taas.com

टोल की लूटमार?


झी २४ तास वेब टीम, नाशिक
 
मुंबई-आग्रा मार्गावरच्या टोल वसूलीमध्ये प्रवाशांची लूट केली जाते आहे. त्यामुळे नाशिकमधल्या प्रवाशांना फटका बसत आहे.  नाशिकपासून इगतपुरी आणि चांदवड अशा काही किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी तब्बल ८० रुपयांचा टोल वसूल केला जात आहे.
 
चांदवड ते धुळे मार्गावर चांदवडच्या आधीच  भव्य टोल उभारण्यात आला आहे. नाशिक शहरातून जर चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी जायचं असेल तर अवघ्या चार किलोमीटरसाठी भाविकाला शंभर रुपये मोजावे लागतात. खरं तर ही टोल वसुली होते ती चांदव़ड-धुळे या नव्वद किलोमीटरच्या मार्गासाठी. विशेष म्हणजे चांदवडला पूर्ण पैसे वसूल करुन धुळ्याच्या टोलवर मात्र वसुली करण्यात येत नाही.
 
याच पद्धतीनं इगतपुरी-पडघा दरम्यान अशीच लूट सुरु आहे. एका टोलवर निम्मे आणि मध्ये दुसरा टोल करुन टप्पेनिहाय टोल वसुली करणं शक्य आहे. पण तसं न करता प्रवाश्यांची सर्रास लूट चालवली आहे. त्यामुळे कृषीमालाची ने-आण, दूध विक्री करणे अशा उद्योगांना मोठा फटका बसतो. टोलचालकांनी मात्र या प्रकरणी हात वर केलेत.
 
नाशिक ही मंदिरांची नगरी असल्यानं मोठ्या प्रमाणात भाविक इथे येतात. त्यामुळे टोलमधून चांगलं उत्पन्न मिळतं. पण टोल वसुलीचं अयोग्य नियोजनामुळे स्थानिकांची मात्र लूट होते.

First Published: Tuesday, November 1, 2011, 07:29


comments powered by Disqus