Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:23
झी २४ तास वेब टीम, जळगाव जळगाव महापालिकेच्या इमारतीत मटक्याचा अड्डा असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वसुली विभागातच पालिकेच्या कर्मचा-यांचा मटक्याचा अड्डा सुरू होता. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं अड्डा उद्धवस्त केला. पालिकेनं मटक्याचा अड्डा चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

महापालिकेच्या भव्य इमारतीत मटक्याचा अड्डा होता, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र पाचव्या मजल्यावरील किरकोळ वसुली विभागात छबिलदास इंगळे, नागराज माळी, अमृत पाटील आणि अशोक विसपूते हे महापालिकेचे कर्मचारी कल्याण मटक्यावर सट्टा लावत होते. अनेक दिवसांपासून इथं मटक्याचा अड्डा सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाला तिथं पाठवून सापळा रचला. बनावट ग्राहकाकडून सट्टा लावताना पथकानं छापा टाकून चारही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.
या मटकेबाज कर्मचाऱ्यांकडून वीस हजार रूपये रोख, जुगाराचे साहित्य आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले. चारही कर्मचाऱ्यांवर मुंबई जुगार अँक्टनुसार कारवाई करण्यात आली. तर महापालिकेनंही जुगारी कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली. या मटक्याच्या अड्ड्यात अजून काही अधिकारी आणि कर्मचा-यांचा सहभाग असल्याचा संशय असल्यानं, पोलीस त्या दिशेनं तपास करत आहेत.
First Published: Saturday, November 5, 2011, 13:23