नाशिक महापौरपदाचा गुंता वाढला... - Marathi News 24taas.com

नाशिक महापौरपदाचा गुंता वाढला...

www.24taas.com, योगेश खरे, नाशिक 
 
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची राजकीय आकडेमोडीचा गुंता सुटता सुटत नाही आहे. मातोश्रीवर झालेल्या सेना-भाजपच्या युतीच्या बैठकीत बाळासाहेबांनी वेगळ्या बोळात घुसू नका. असा सूचक इशारा दिल्यानं मनसेची कोंडी झालीय. पुणे पॅटर्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येतय. मात्र काँग्रेसनं जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नसल्याचं सांगितलं आहे.
 
नाशिक महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असले तरी कुणाला बरोबर घ्यायचं अथवा कुणाला साथ द्यायची. यावरुन घोडं अडलं आहे. कारण सत्तेसाठी इथं राबवल्या जाणा-या पॅटर्नचा बोलबाला राज्यात होणार असून त्याचे दूरगामी परिणामही त्या पक्षांना भोगावं लागणारेत. शिवसेना आणि भाजप या दोघांकडं ३३ संख्याबळ होतंय. त्यामुळं ६२ हा मॅजिक फिगर गाठण्यासाठी तीस जागांची आवश्यकता आहे. यासाठी राष्ट्रवादी, अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या साथीनं पुणे पॅटर्नची पुनरावृत्ती होऊ शकते. शिवसेना मात्र याबाबत विचारमंथन होत असल्याचं सांगतायत.
 
राष्ट्रवादीबरोबर जाण्याची भूमिका घेतल्यास भाजपाची कोंडी होणाराय. नाशिक वाचवा या भूमिकेतून गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी स्वबळावर लढलेल्या भाजपपुढं धर्मसंकट उभं आहे. तसंच बाळासाहेबांनी भाजप नेत्यांचं कान पिळल्यानं मनसेबरोबरची राजकीय गणितंही बिघडलीयत. त्यामुळं स्थानिक भाजप नेत्यांनी सावध पवित्रा घेतलाय.
 
रिपाईंचा महापौर करण्याचा राष्ट्रवादीनं ठेवलेला प्रस्ताव काँग्रेसनं धुडकावतं आम्ही जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नसल्याचा खुलासा काँग्रेस नेत्यांनी केलाय.
 
मनसेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी हा घोळ मांडला आहे. त्यामुळं सर्वाधिक जागा पटकावणा-या मनसेला नाशिकमध्ये सत्तेचा सोपान चढण्यासाठी सहकारीच मिळेनासा झाला आहे.
 
 

First Published: Sunday, February 26, 2012, 19:33


comments powered by Disqus