Last Updated: Sunday, March 11, 2012, 15:47
www.24taas.com,धुळे-जळगाव 
धुळे आणि जळगावात कच्च्या तेलाचे साठे आढळून आलेत. तेलाचे साठे काढण्यासाठी गावक-यांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी विहीर खणण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरु केलेल्या जमिन अधिग्रहणाला गावक-यांनी विरोध केला आहे.
गावक-यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याची ही नोटीस.. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही नोटीस पाहून धुळे आणि जळगाव जिल्ह्यातल्या गावातल्या गावक-यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. या गावात पावसाळ्यात कच्च्या तेलाचे साठे आढळल्यानं ही नोटीस बजावून हरकती मागवण्यात आल्यात. साठे शोधण्यासाठी इथं विहीरी खणण्यात येणार आहेत. मात्र कोणत्या प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहित करण्यात येतायत आणि त्याचे काय परिणाम होणार याची माहिती गावक-यांना देण्यात आलेली नाही.
फाशीवर लटकवा मात्र जमिनी नका घेऊ अशी आक्रमक भूमिका गावक-यांनी घेतलीय. या प्रकल्पाविरोधातला ठरावही ग्रामसभेनं मंजूर केला आहे. केवळ ग्रामस्थच काय जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदही या प्रकल्पाबाबत अंधारात आहेत.
First Published: Sunday, March 11, 2012, 15:47