Last Updated: Friday, November 11, 2011, 16:47
झी २४ तास वेब टीम, नाशिक राज्यभरात सुरु असलेल्या पोलीस भरतीदरम्यान धावताना आणखी एका उमेदवार तरुणाचा मृत्यू झाला. याआधीच दोन दिवसांपूर्वी अमरावतीत एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. तर काल नाशिकमध्ये नांदेडहून भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.
शेख आली बाबू शेख नावाचा 24 वर्षीय तरुण पाचशे मीटर धावण्याची स्पर्धा आटोपून विश्रांती घेत होता. त्यावेळी अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ झालेल्या या तरुणाला मग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.पोलिसांत भरती होण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या या तरुणाचा मृतदेह आज नातेवाईकांना ताब्यात घ्यावा लागला. पोलीस भरतीसाठी केलेली धावाधाव जीवावर बेतल्यानं त्याच्या नातेवाईकांनाही दुःख अनावर झालं.
अनेक तरूणांची इच्छा असते ती म्हणजे स्वत:च्या अंगावर खाकी वर्दी असावी आणि त्यासाठीच जीवापाड वर्षभर पोलीस भरतीसाठी तयारी करीत असतात. परंतु आता हीच पोलीस भरती जीवावर उठते आहे. त्यामुळे अनेक तरूणांच्या भवितव्याच्या प्रश्न आहे. यावर आर. आर. पाटील यांनी यासाठी काही बदल करावेत अशी मागणी केली जात आहे.
First Published: Friday, November 11, 2011, 16:47