मनसेचा नाशिक, औरंगाबादमध्ये जल्लोष - Marathi News 24taas.com

मनसेचा नाशिक, औरंगाबादमध्ये जल्लोष

www.24taas.com, नाशिक
 
नाशिकमध्ये महापौरपदी मनसेचा उमेदवार बसणार हे पक्कं झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला. वाद्यांच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते, त्यांच्या हातात फडकणारे मनसेचे झेंडे आणि जयजयकाराच्या घोषणा यांनी नाशिकमधलं वातावरण दुमदुमून गेल होते.
 
 
 
नाशिकमध्ये मनसेचा पहिला महापौर निवडून आल्यानंतर नाशिक आणि औरंगाबादमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. महापौरपदाच्या निवडणुकीत यतीन वाघ हे ५६ मतांनी विजयी झाल्याचे वृत्त समजताच फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. दरम्यान, मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी सेनेवर टीका केली. आम्ही नाशिकचा कसा विकास करतो, ते पाहा, असे सांगत विकासाला प्राधान्य असेल असे राज यांनी स्पष्ट केले आहे. तर नवीन महापौर यतीन वाघ यांनी विकासाला प्राधान्यक्रम देण्याचे आश्वासन दिले आहे.
 
 
भाजपने केला विश्वासघात - सेना
भाजपनं मनसेला पाठिंबा दिला. तर शिवसेनेनं भाजपवर विश्वासघात केल्याचा आरोप करत निवड प्रक्रियेपूर्वीच सभात्याग केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसनंही निवडणुकीपूर्वीच पराभाव मान्य करत तटस्थ राहणार असल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली होती. त्यामुळं मनसेचा सत्ता संपादनाचा मार्ग अधिकच सुकर झाला होता,  तर उपमहापौरपदी भाजपच्या सतीश कुलकर्णी यांची निवड झालीय. नाशिकच्या या नाट्यमय घडामोडींमुळं नव्या राजकीय समीकरणांची नांदीच असल्याचं बोललं जात आहे.
 
 
 औरंगाबादमध्ये  फटाकेबाजी
नाशिकमध्ये मनसेचा पहिला महापौर निवडून आल्याचा औरंगाबादमध्येही जल्लोष करण्यात आला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल वाजवून आणि मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला. नाशिकनंतर आता औरंगाबाद जिल्हा परिषदेतही चमत्कार घडवणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
 
 
औरंगाबादमध्ये मनसे किंग मेकरच्या भूमिकेत आहे. त्यामुळे मनसे कुणासोबत जाणार याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकांमध्ये मनसेनं काँग्रेसला साथ दिली. हाच कित्ता मनसेनं अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्येही गिरवला तर  गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेला पायउतार व्हावं लागणार आहे. त्यामुळे मनसेच्या निर्णयावरच सर्वांच्या नजरा खिळल्याएत.

First Published: Thursday, March 15, 2012, 17:01


comments powered by Disqus