बंटी, बबली चोरजोडी गजाआड - Marathi News 24taas.com

बंटी, बबली चोरजोडी गजाआड

झी २४ तास वेब टीम, नाशिक
 
चोऱ्यांचं प्रमाण नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले असताना घरफोडी आणि चेन चोरणाऱ्या बंटी आणि बबलीला नाशिक पोलिसांनी जेरबंद केलं. त्यांच्याकडून चाळीस तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
 
ह्या निरागस चेहऱ्याच्या मुलाला आणि मुलीला पाहून ते शाळकरी विद्यार्थी वाटतील. पण दोघांनी नाशिकमध्ये अनेकांना गंडा घातला. दिपाली उर्फ राणी अनिल मथुरे आणि प्रशांत अशोक काळे या दोघांनी १२ घरफोड्या आणि १४ सोन्याची चेन चोरल्यात. दिपालीच्या मदतीनं सावज हेरून त्यांनी घरफोड्या केल्याचं उघड झाल. आईला ट्युमर असल्याचं सांगत सहानुभूती मिळवून हे दोघे डल्ला मारायचे. पोलिसांनी धान्याच्या पोत्यात लपवलेले दागिने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चाळीस तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये जप्त करण्यात आले.
 
चोऱ्या करून मग एक एक दागिना सराफाला विकून ते आपला चरितार्थ चालवत. मात्र अखेर त्यांच बिंग फुटलं आणि बंटी आणि बबलीची ही जोडी गजाआड झाली. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

First Published: Sunday, November 13, 2011, 08:18


comments powered by Disqus