Last Updated: Wednesday, March 28, 2012, 18:10
मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक नाशिकच्या वडाळा गावात भंगार गोदामांना भीषण आग लागल्यानं १८ ते २० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे नाशिकसाठी तापदायक ठरलेल्या भंगार गोदामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नाशिकच्या वडाळागाव परिसरात झोपड्यांना लागलेल्या आगीमुळे अनेक संसार उघड्यावर आलेत. झोपड्यांच्या बाजूला असलेल्या भंगारच्या गोदामांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करुन प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार करण्याचं काम अनधिकृतपणे करण्यात येत होतं.
आगीमुळे नाशिकमधल्या भंगार गोदामांचा विषय पुन्हा चर्चेत आलाय. नवनिर्वाचित महापौरांनी घटनास्थळाला भेट देऊन अनधिकृत गोदामांवर कारवाईचा इशारा दिलाय. याआधीही अनेकवेळा अनेक नेत्यांनी भंगारच्या गोदामांवर कारवाईचा इशारा दिलाय. पण कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता नाशकात सत्तापालट झाल्यावर तरी कारवाई होणार की हेसुद्धा फक्त आश्वासनच ठरणार, हे पाहावं लागेल.
First Published: Wednesday, March 28, 2012, 18:10