Last Updated: Wednesday, April 4, 2012, 09:46
विकास भदाणे,www.24taas.com, जळगाव मोठा गाजावाजा करत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी केंद्राकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र त्यातही भ्रष्टाचार बोकाळल्याचं पहायला मिळतं. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातील घोडगावमध्ये जलस्वराज्य पाणी योजनेत ५१ लाखांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे.
चोपडा तालुक्यातील घोडगाव या गावात गेल्यावर्षी ५१ लाख रूपये खर्च करून ‘जलस्वराज्य’ योजनेच्या माध्यमातून पाणी योजना पूर्ण करण्यात आली. गावातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी ही योजना राबवण्यात आली. मात्र तत्कालीन सरपंचानं या योजनेचं काम अतीशय निकृष्ट दर्जाचे केलं. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तयार करण्यात आलेली टाकी काही दिवसातच पडकी झाली आहे. तर जुनीच पाईपलाईन नवी दाखवण्यात आली आहे.
मात्र, गावातल्या या योजनेतील घोटाळ्याबाबत आवाज उठवणा-या तिथल्या ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबियांनाच मारहाण करण्यात आली. या योजनेसाठी १० टक्के लोकवर्गणी गोळा करण्यात आली. त्यामुळे या पाणी योजनेत गावाचाही पैसा पाण्यात गेलाय.
First Published: Wednesday, April 4, 2012, 09:46