बापानेच केली मुलीची हत्या - Marathi News 24taas.com

बापानेच केली मुलीची हत्या


www.24taas.com, विकास भदाणे, पारधी, जळगाव

पुरोगामी समजल्या जाणा-या महाराष्ट्रात खोट्या प्रतिष्ठेपायी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झालीय. साता-यापाठोपाठ जळगावमध्येही जातीच्या प्रतिष्ठेपायी आपल्या मुलीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
 
 
जळगाव जिल्ह्यातल्या पाथरीमधील ही 19 वर्षांची मनिषा धनगर आता या जगात नाही. तिची गळा दाबून निर्दयीपणे हत्या करण्यात आली. हत्येनंतर तीचा मृतदेह 5 किलोमीटर अंतरावर दहिगावजवळच्या रेल्वे स्टेशनवर फेकून देण्यात आला.
 
 
विशेष म्हणजे हे कृत्य कुणा ति-हाईतानं केलेलं नाही..तिचे वडील आणि काकानेच तिची हत्या केलीय. मनिषाचा गुन्हा एव्हढाच की तिनं दुस-या जातीतल्या मुलावर प्रेम केलं. पण तिला या प्रेमाची अशी शिक्षा भोगावी लागली...या हत्येप्रकरणी मनिषाचे वडील युवराज आणि काका शरद धनगर यांना पोलिसांनी अटक केली.
 
 
खोट्या प्रतिष्ठेपायी रक्ताची नाती संपवण्याचे प्रकार राज्यात वारंवार घडतायेत. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच साता-यातही असा प्रकार घडला होता. मात्र त्यातून कोणताही धडा न घेता माणुसकीला काळीमा फासणारी कृत्यं सुरूचं आहेत. त्यामुळे पुरोगामी समजल्या महाराष्ट्रातील घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी पुन्हा एकदा सामजिक क्रांतीची गरज भासू लागलीय.

First Published: Monday, April 9, 2012, 13:52


comments powered by Disqus