शवविच्छेदनासाठी मनिषाचा मृतदेह उकरणार - Marathi News 24taas.com

शवविच्छेदनासाठी मनिषाचा मृतदेह उकरणार

www.24taas.com, जळगाव
 
जळगावात खोट्या प्रतिष्ठेसाठी हत्या केलेल्या मनीषा धनगर हिच्या मृतदेहाचं पुन्हा पोस्टमॉर्टेम होणार आहे. त्यासाठी मनीषाचा मृतदेह आज उकरला जाणार आहे. परजातीतल्या मुलाशी लग्न करण्याचा आग्रह मनीषानं धरला होता.
 
मनीषाच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. समाजात बदनामी होईल या भीतीनं खोट्या  प्रतिष्ठेपायी मनीषाचे वडील, काका आणि आजीने हत्या केली होती. तिचा मृतदेह रेल्वे रुळाच्या शेजारी टाकला होता. अनोळखी मृतदेह म्हणून तो नंतर पुरण्यात आला होता.
 
पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्यामुळं युवराज धनगर हेच मनीषाचे वडील होते हे सिद्ध करण्यासाठी मदत होणार आहे. जळगावातील खोट्या प्रतिष्ठेचा बळी ठरलेल्या मनिषा धनगर हत्येप्रकरणी, तिच्या वडील आणि काकांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर मनिषाच्या आजीला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर सामोपचारानं हा प्रश्न मिटवता आला असता, असं मयत मनिषाचा प्रियकर संदीप पाटीलनं म्हटलं होतं.
 
 
 

First Published: Tuesday, April 10, 2012, 17:37


comments powered by Disqus