राष्ट्रीय हजारो अण्णा पार्टी नवा पक्ष - Marathi News 24taas.com

राष्ट्रीय हजारो अण्णा पार्टी नवा पक्ष

झी २४ तास वेब टीम, नाशिक
 
नाशिकमध्ये महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एका नव्या पक्षाची स्थापना करण्यात आलीय. मात्र, त्या पक्षाचं नाव ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावणार आहेत. कारण त्या पक्षाचं नावच राष्ट्रीय हजारो अण्णा पार्टी असं ठेवण्यात आलंय. अण्णांनी आपलं नाव वापरू नका असा इशारा दिल्यानं जन्माआधीच हा पक्ष चर्चेत आलाय.
 
२१ नोव्हेंबरला देशाच्या राजकीय इतिहासात नव्या पक्षाची स्थापना झाली. मंदिरांची नगरी असलेल्या नाशकात राष्ट्रीय हजारो अण्णा पार्टी हा पक्ष स्थापन झाला. स्थानक वर्तमानपत्रात तशीही घोषणही करण्यात आलीय. दत्ताजी वाघ हे या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. या पक्षाचे कार्यकर्ते भ्रष्टाचार विरहीत अण्णा म्हणजेच मोठे भाऊ बनून कार्य करणार असल्याचं जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे हजारो अण्णा आणि अण्णा हजारे यांचा थेट संबंध नसल्याचं स्पष्टीकरण या पक्षाकडून देण्यात आलंय.
 
भ्रष्टाचाराला कंटाळलेला आम आदमी अण्णा हजारेंच्या मागे उभा राहू लागल्यानं काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. अण्णा हजारेंनी राजकारणातला प्रवेश टाळला असला तरी आम्ही त्यांच्यामागे ठामपणे उभं राहू असं या पक्षानं स्पष्ट केलंय. अण्णा हजारेंनी राजकीय पक्ष काढल्यास त्यात विलीन होण्याचीही त्यांची तयारी आहे.
 
राष्ट्रीय हजारो अण्णा पार्टीवर समाजसेवक अण्णा हजारे काय प्रतिक्रिया देतात आणि निवडणूक या पक्षाची नोंदणी करणार का, असे प्रश्न आता उपस्थित झालेत.

First Published: Wednesday, November 23, 2011, 05:26


comments powered by Disqus