सेनेने नाशिकमध्ये केला मनसेचा 'गेम' - Marathi News 24taas.com

सेनेने नाशिकमध्ये केला मनसेचा 'गेम'

www.24taas.com, नाशिक 
 
आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या नाशिक स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारत मनसेला झटका दिला आहे. उद्धव निमसे यांनी मनसेच्या अशोक मुर्तडक यांना ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. त्यामुळं आता प्रभाग समित्यांमध्येही मनसेची कोंडी होणार आहे.
 
नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उद्धव निमसे यांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर ९ मते मिळवतं बाजी मारली. मनसेच्या अशोक मुर्तडक  यांना ७ मते मिळाली. निमसे यांना काँग्रसेची २, राष्ट्रवादी आणि सेनेची प्रत्येकी ३ आणि अपक्षाचं १ मतं मिळालं. तर मुर्तडक यांना मनसेची ५ आणि भाजपची २ मतं मिळाली. शिवसेना तटस्थ राहणार काय ही उत्सुकता होती मात्र त्यांनी काँग्रेसला साथ देणं पसंत केलं.
 
स्थायी समितीचं अध्यक्षपद काँग्रेसकडं आल्यानं सत्ताधारी मनसे-भाजपला झटका बसला. त्यामुळं महापालिकेतलं आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या स्थायी समितीत विरोधकांनी बाजी मारली आहे. आता मनसेनं छगन भुजबळांना टार्गेट केलं आहे.
 
एकमेकांवर आरोप करणारे शिवसेना,मनसे आणि राष्ट्रवादीनं आघाडी करत मनसेला रोखलं आहे. भुजबळांना सगळ्या विरोधकांना एकत्र करत महापौरपदाच्या निवडणुकीतलं उट्ट काढलं आहे. आता ६ प्रभाग समित्यांमध्येही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
 
 

First Published: Wednesday, April 18, 2012, 21:23


comments powered by Disqus