पाण्यासाठी जीव गेला - Marathi News 24taas.com

पाण्यासाठी जीव गेला

www.24taas.com,मालेगाव
 
राज्यात पाणी टंचाईनं आणखी एक जीव गेला आहे. नाशिक जिल्हात विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या रखुबाई सोनावणे या पन्नास वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय. मालेगाव वळवाडे गावात ही घटना घ़डली.
 
ही आदिवासी महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. तेव्हा विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. पंधराच दिवसात राज्यातला पाणी टंचाईचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वी ठाणे जिल्ह्यातल्या मोखाड्यातही एका महिलेचा पाणी भरताना गुदमरुन मृत्यू झाला होता.
 
राज्यात पडलेला दुष्काळ सामान्य जनतेसाठी ‘यमदूत’ बनत चालला असून ठाण्यानंतर  मालेगावमध्ये एका महिलेचा ‘दुष्काळा’मुळे बळी गेला. मालेगावमधील वळवाडी गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी झुंबड उडाली. या गर्दीतच पाण्यासाठी झटापट करणार्‍या रखमाबाई लोटन सोनवणे (५०) या महिलेचा तोल गेला आणि विहिरीत कोसळून तिचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
 
मालेगावमधील वळवाडी गावात भीषण पाणीटंचाई आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या विहिरीचे पाणी तळाला गेले असून तेथे दिवसरात्र पाणी भरण्यासाठी गर्दी असते. ही विहीर २० फूट खोल असून तळाचा भाग खडकाळ आहे. बुधवारी या विहिरीवर प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे पाणी काढताना रखमाबाई यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत कोसळला. गंभीररीत्या जखमी झालेल्या रखमाबाईंना तातडीने मालेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तेथे  त्यांचा मृत्यू झाला.

First Published: Thursday, May 10, 2012, 09:22


comments powered by Disqus