Last Updated: Thursday, May 10, 2012, 23:54
www.24taas.com, नाशिक नाशिकचा अभिमान असणारी गोदामाई सध्या तिचं सौंदर्यच हरवून बसलीय. गेल्या अनेक वर्षांपासून ही नदी पानवेलींच्या विळख्यात सापडलीय. वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासनावर म्हणावा तसा परिणाम झालेला नाही. आता नाशिककर पुन्हा नव्या उमेदीनं गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आंदोलनात उतरलेत.
नाशिकच्या बहुचर्चित गोदापार्कमधले हे सर्व पर्यावरणप्रेमी महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेत. कधीकाळी नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारी गोदामाई आज सौंदर्य हरवून बसलीय. प्रशासनाला जागं करण्यासाठी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाची स्थापना करण्यात आलीय. गोदावरीच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केलीय.
गेल्या तीन वर्षांपासून गोदावरीला पानवेलींनी वेढलंय. निवडणुकीच्या काळातही गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजला. मात्र जसा निवडणुकांचा काळ ओसरला तशा पानवेली पुन्हा दिसू लागल्यायत. महापौरांनीही आता विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचं कारण दिलंय.
गोदावरी प्रदुषणाप्रकरणी साधू संतांची भेट घेऊन आगामी कुंभमेळ्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. तसंच अण्णा हजारेंची मदत घेऊन मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा गोदावरी गटारीकरण विरोधी मंचानं दिलाय.
First Published: Thursday, May 10, 2012, 23:54