ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचं निधन, Sudhir Bhat, suyoga theatrical production company

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचं निधन

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचं निधन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचं हृदयविकाराच्या तिव्र धक्क्यानं निधन झालं. छातीत दुखत असल्यानं हिंदूजा हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. भट यांच्या निधनानं मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

सुयोग नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांचे रात्री १०.३०च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.

सुधीर भट यांनी गोपाळ अलगेरी यांच्या साथीने सुयोग या नाट्यसंस्थेची १९८५ मध्ये स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ७० पेक्षा जास्त नाटके, १५ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणाऱ्या पाच नाटकांची निर्मिती त्यांनी केली. तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारा वादग्रस्त निर्माता म्हणून भट चर्चेत राहिले.
देशा-विदेशात मराठी नाटकांचे प्रयोग करण्यासाठी सुधीर भट यांनी बरीच धडपड केली. त्यांच्या अनेक गाजलेल्या नाटकांना अमेरिकेतही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

उच्च निर्मितीमूल्य, चांगले मार्केटिंग यांच्या जोरावर त्यांची नाटके गाजली. त्याचवेळी काही नाटकांना अपयश आल्यामुळे सुयोगला मोठा आर्थिक फटकाही बसला. मात्र अखेरपर्यंत उत्साहाने नाट्यनिर्मिती करण्याचे व्रत त्यांनी कायम ठेवले. नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रशांत दामले, विजय चव्हाण अशा अनेक गुणी कलाकरांना मोठे केले. सध्या ते बेईमान या नाटकाची निर्मिती करण्यात गुंतले होते.

सुधीर भट यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दरम्यान आज सकाळी त्यांच पार्थीव अंत्यदर्शनासाठी यशवंत नाट्यमंदिर येथे ठेवणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलीये.


 
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 16, 2013, 08:17


comments powered by Disqus