नाट्यपंढरी सांगली रंगणार नाट्यसंमेलन - Marathi News 24taas.com

नाट्यपंढरी सांगली रंगणार नाट्यसंमेलन

www.24taas.com, सांगली
 
नाट्यपंढरी सांगलीत होणाऱ्या नाट्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असुन सांगलीत ९२ वे नाट्य संमेलन १९ ते २२ जानेवारी असे चार दिवस रंगणार आहे. 'घाशीराम कोतवाल' या नाटकाने संमेलनाचा सुरूवात होणार आहे तर 'वाऱ्यावरची वरात' या नाटकाने संमेलनाचा समारोप होणार आहे. सांगलीला चौथ्यांदा नाट्यसंमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला असुन नाट्य पंढरीच्या लौकिकाला साजेशे संमेलन होइल असा विश्वास आयोजक व्यक्त करत आहेत.
 
नाट्यपंढरी सांगलीला १९२४, १९४३, १९८८, अशी तीन नाट्य संमेलने आयोजीत करण्याचा मान मिळाला आहे. यंदा चौथ्यांदा सांगलित होणाऱ्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ नाट्य सिने अभिनेते श्रीकांत मोघे हे भूषवणार असुन २१ जानेवारीला बालगंधर्व नगरीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाट्य संमेलनाचे उद्दघाटन होईल. मुख्य रंगमंच, दोन व्यासपीठ, एकवीस फुटी भव्य कमान, चार अन्य प्रवेशव्दारे, प्रेक्षागृहे उभारण्यात आली असुन अभिनेते अमोल पालेकर हे रंगकर्मीची कार्यशाळा घेणार आहेत त्यासाठी क्रिडांगणावर स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
 
या संमेलनात ज्येष्ठ लोकलावंत तमाशा कलावंताचा सत्कार कऱण्यात य़ेणार आहे. या संमेलनात सांगलीकरांच्या वाट्याला भरभरून कार्यक्रम येणार आहेत. यात एक महानाटय, तीन नाटके, २५ पथनाट्य, १ एकांकीका, १ मूकनाट्य, १ एकपात्री प्रयोग, तमाशातील गण, गणगवळण, वग, बालनाट्ये लोकगीतांचे कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम आहेत. बालगंधर्वनगरीत आरंभ ते प्रारंभ हे सांगलीच्या रंगभूमीच्या इतिहासाचा वेध घेणारे १५० कालाकारांचा सहभाग असणारे महानाट्य सादर होणार आहे. एकुणच नाट्यपंढरीत संमेलनाची जय्यत तयारी आहे.

First Published: Thursday, January 19, 2012, 22:17


comments powered by Disqus