'पुरुष' पुन्हा रंगभूमीवर दाखल - Marathi News 24taas.com

'पुरुष' पुन्हा रंगभूमीवर दाखल

www.24taas.com, मुंबई
 
जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि एकेकाळी मराठी रंगभूमीवर गाजलेलं 'पुरुष' नाटक नुकतंच नाट्यरसिकांच्या भेटीला आलंय. हाऊसफुलच्या गर्दीत या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत.
 
पुरुषी मनोवृत्ती आणि त्या मनोवृत्तीला बळी पडलेल्या एका स्त्रीची कथा पुरुष या नाटकातून मांडण्यात आली आहे. मुळातच पुरुषांमध्ये असलेला अहंकार आणि त्याला बळी पडणाऱ्या स्त्रिया यावर य़ा नाटकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलंय. नाना पाटेकर, उषा नाडकर्णी, रिमा या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने एके काळी हे नाटक खुपच गाजवलं होतं. नुकतंच हे नाटक नव्या संचात रंगभूमीवर दाखल झालंय.
 
विशेष म्हणजे नाटकाच्या दिग्दर्शनासह गुलाबरावाची प्रमुख भूमिका मोहन जोशी यांनी साकारली आहे.  तर ज्योती चांदेकर, शृजा प्रभुदेसाई यांच्याही या नाटकात  महत्वपूर्ण भूमिका आहेत. बॅरिस्टर, मोरुची मावशी या दोन नाटकांच्या यशस्वी पुनरागमनानंतर ‘अस्मी प्रॉडक्शन’ने हे नाटक रंगभूमीवर आणलंय.
 

पुरुष या नाटकाचेही फक्त २५ प्रयोगच रसिकांच्या भेटीला येणार आहेत. आत्तापर्यत हाऊसफुलचा बोर्ड प्रेक्षकांनी नाट्यगृहांच्या बाहेर झळकावलाही. पुनर्निर्मितीच्या माध्यमातून नाट्यवेड्या रसिकांसाठी अशा नाटकांची ही एक पर्वणीच म्हणावी लागेल.
 

First Published: Wednesday, April 4, 2012, 12:42


comments powered by Disqus