Last Updated: Tuesday, January 17, 2012, 17:51
www.24taas.com, सांगली

राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसाठी दोन्हीकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असताना, अपेक्षेप्रमाणे सांगलीत मात्र दोन्ही कॉंग्रेस एकमेंकाविरुद्ध ठाकल्याचे चित्र दिसतयं. राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात कांग्रेस बंड ठोकत आज रस्त्यावर उतरली. महापालिकेमध्ये राष्ट्रवादीने भाजपासोबत हातमिळवणी करत सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलयं. महापालिकेत भ्रष्टाचाराची बजबजपूरी मांडलीय असा आक्षेप घेत, कॉंग्रेसने आज राष्ट्रवादीविरुद्ध तिरडी मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुतळा दहन करणा-या कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली.
सांगली हा हेवीवेट नेत्यांचा जिल्हा मानला जातो. काँग्रेसचे पतंगराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील, आर.आर.पाटील यासारखे दिग्गज नेते तर सांगली आणि मिरजमध्ये भाजपचे आमदार निव़डून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सांगली लोकसभा कायम काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. तर सांगलीवर वसंतदादा पाटील घराण्याचे वर्चस्व अबाधित राहिलं पण मधल्या काळात जनता दलाचे संभाजी पवार आमदार म्हणून निवडून आले. आता ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. सांगली जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच कुरघोडीचे राजकारण रंगत आलं आहे.
First Published: Tuesday, January 17, 2012, 17:51