Last Updated: Tuesday, January 17, 2012, 23:58
www.24taas.com, नागपूर 
भाजप अध्यक्ष नितीन गडकरींच्या ताब्यात असलेली नागपूर महापालिका खेचण्यासाठी काँग्रेसनं चांगलाच जोर लावला आहे. २०१४ च्या निवडणुकीत गडकरींनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळं काँग्रेसनं आतापासूनच शहरावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर प्रत्येक निवडणूक पक्ष शर्थीनं लढवतो असं सांगत भाजपनं ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीला अजून दोन वर्षांचा अवधी शिल्लक आहे. मात्र लोकसभेच्या रणांगणाची चाहूल आतापासूनच लागू लागली आहे. भाजप अध्यक्ष नितीन गडकरींना त्यांच्याच शहरात घेरण्याची तयारी काँग्रेसनं केली आहे. आधी महापालिका आणि नंतर लोकसभा या क्रमानं गडकरींना त्यांच्याच शहरात मात देण्याचे मनसुबे स्थानिक नेत्यांनी रचलेत. त्यामुळे अमेठी आणि रायबरेलीसारखं महत्व इथल्या निवडणुकीला आलं आहे.
काँग्रेसनं महापालिका सर करण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे चार पदाधिकारी आखाड्यात उतरवलेत. त्यामुळं भाजपनंही जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक निवडणूक महत्वाची असून कार्यकर्त्यांच्या बळावर नागपूर महापालिकेचा गड सर करु असा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे. काँग्रेस आणि भाजपनं महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळं प्रचाराच्या काळात इथं चांगलंच युद्ध रंगणार आहे. कारण याच युद्धावरून आगामी लोकसभेचा कल लक्षात येणार आहे.
First Published: Tuesday, January 17, 2012, 23:58