अकोल्यात त्रिशंकूने केला घोळ - Marathi News 24taas.com

अकोल्यात त्रिशंकूने केला घोळ

www.24taas.com, अकोला 
 
त्रिशंकु स्थिती असलेल्या अकोला महापालिकेत सत्तास्थापनेसाठी सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ७३ सदस्य असलेल्या अकोला महापालिकेत ३७ हा बहुमताचा जादूई आकडा पार करण्यासाठी भाजप-सेना युती आणि काँग्रेस आघाडीमध्ये जोरदार चुरस सुरू आहे.
 
अकोल्यात युतीला २६ आणि आघाडीला २३ जागा मिळाल्या आहेत तर अपक्षांचं संख्याबळ १५ आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या संजय आणि माधुरी बडोने या दाम्पत्यानं भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे युतीचं संख्याबळ २८वर पोहचलं आहे. पुढच्या दोन दिवसात आणखी तीन अपक्ष नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
 
दुसरीकडे महापौर पदाचं आरक्षण महिला अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. आघाडीकडे या प्रवर्गातील महिलाच नसल्यानं आघाडीनं प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला महापौरपद देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

First Published: Tuesday, February 21, 2012, 13:39


comments powered by Disqus