Last Updated: Saturday, October 27, 2012, 15:31
www.24taas.com, ग्रेटर नोएडा अभिनेता हृतिक रोशन रविवारी होणाऱ्या इंडियन ग्रांप्री फॉर्म्युला वन रेसच्या सुरवातीला झेंडा दाखविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारतात गेल्यावर्षी या रेसला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने झेंडा दाखविला होता. जेपी ग्रुपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेसच्या सुरवातीला झेंडा दाखविण्यासाठी आम्ही हृतिकच्या नावाची शिफारस फॉर्म्युला वन व्यवस्थापनाकडे (एफओएम) केली आहे. आम्हाला विश्वास आहे, की त्याच्या नावाला संमती मिळेल. या रेसचा आनंद घेण्यासाठी हृतिकसह अनेक सेलिब्रिटी ग्रेटर नोएडामध्ये दाखल झाले आहेत.
कार रेसिंगची आवड असलेल्या सचिनने यावर्षी या रेसपासून दूर राहणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. सचिन रेल्वेविरुद्ध मुंबई संघाकडून रणजी सामना खेळणार आहे. त्यामुळे सचिनने या रेसपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या रेसला भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, युवराजसिंग, विराट कोहली, हरभजनसिंग, श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि टेनिसस्टार सानिया मिर्झा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
First Published: Saturday, October 27, 2012, 15:31