Last Updated: Monday, November 25, 2013, 21:21
www.24taas.com, झी मीडिया, दक्षिण अर्जेंटीना टेनिसविश्वात अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या राफएल नादालमध्ये एका अनोख्या ठिकाणी लढत रंगली होती. हिमनदीवरील बोटीतच हे दोघे चक्क टेनिस कोर्टवर उतरले आणि त्यांच्या चाहत्यांनाही एक सुखद धक्का बसला. या दोघांनीही या ठिकाणाचा मनमुराद आनंद लुटता.
नोवाक जोकोविच आणि राफाएल नादाल या जगातील दोन अव्वल टेनिसपटूंमध्ये आत्तापर्यंत दहा देशांमध्ये विविध ठिकाणी 39 मॅचेस खेळल्या गेल्या आहेत. मात्र जगातील या दोन सर्वोत्तम टेनिस प्लेअर्सना प्रथमच जगातील एका सर्वोत्तम प्रेक्षणीय ठिकाणी टेनिस खेळताना पाहण्याचा आनंद त्याच्या चाहत्यांना लुटता आला. जोकोविच आणि नादालने चक्क बोटिवरील तरंगत्या कोर्टवरच टेनिस मॅच खेळली! हिमनदीवरील या दोन दिग्गज प्लेअर्सची मॅच आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी चाहत्यांनीही एकच गर्दी केली होती.
अर्थातच ही कोणतीही प्रोफेशनल मॅच नव्हती हे साऱ्यांच्या लक्षात आलच असेल. मात्र तरीही तुम्हाला प्रश्न पडला असेल चक्क हिमनदीमध्ये हे दोघे कशासाठी मॅच खेळत असावेत आणि हे ठिकाण नक्की आहे तरी कुठे?... तर जोकोविच आणि नादाल दरम्यान ही एक एक्झिबिशन मॅच आयोजित करण्यात आली होती... आणि हे ठिकाण आहे दक्षिण अर्जेंटीनातील पेरिटो मॉर्नो ग्लेसिअर... पर्यटनाला चालना देण्यासाठी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेल्या या दोन टेनिस प्लेअर्स दरम्यान बोटीवरच या एक्झिबिशन लढतीचं आयोजन करण्यात आलं होत. या दोन दिग्गज प्लेअर्सनेदेखील या मॅचचा मनमुराद आनंद लुटला.
‘आपल्या आई-वडिलांनी याठिकाणी भेट देण्यास आपल्याला सांगितल होतं. सर्वाधिक प्रेक्षणीय ठिकाण असलेल्या या ग्लेसिअरला आपण यापूर्वी कधीही भेट दिली नव्हती, मॉर्नो ग्लेसिअर अदभूत आहेत’, असं ट्विटही नादालने या ठिकाणाला भेट दिल्यानंतर केलं. तर जोकोविचनं ‘एवढं सुंदर ठिकाण असेल याचा आपण कधी विचारही केला नव्हता’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. विशेष म्हणजे या प्रेक्षणीय ठिकाणी हे दोघेही आपण प्रतिस्पर्धी आहोत हे विसरून एकमेकांना आजूबाजूचे हिमनग दाखवत निसर्गाचा आस्वाद घेतानाचं दुर्मिळ असं दृश्यही त्यांच्या चाहत्यांना पहायला मिळाला.
व्हिडिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 25, 2013, 19:27