परिस्थितीवर मात करत सायलीनं सुवर्णपदक मिळवलंच, sayali ghuge win gold medal in tiquando championship

परिस्थितीवर मात करत सायलीनं सुवर्णपदक मिळवलंच

परिस्थितीवर मात करत सायलीनं सुवर्णपदक मिळवलंच
www.24taas.com, झी मीडिया, कल्याण

घरची बेताची परिस्थिती आणि वडीलांच्या आजारपणात त्यांना सांभाळत ती आपलं शिक्षण घेत आहे. ती फक्त शिकतेय एव्हढचं नाही तर राष्ट्रीय पातळीवर इंडियन नॅशनल तायक्वांडो चॅम्पियन स्पर्धेत तिनं सुवर्ण पदकाची कमाई केलीय. ही कहाणी आहे कल्याणमधल्या सायली घुगेची...

कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरात राहणाऱ्या सायली घुगेनं नवी दिल्लीच्या तालकटोरा इथं ‘इन डोअर स्टेडीयम’मध्ये नुकत्याच पार पडलेल्या इंडियन नॅशनल तायक्वांडो चॅम्पियन टुर्नामेंटमध्ये गोल्ड मेडलची कमाई केलीय. घरच्या परिस्थितीवर मात करुन तिनं स्वसंरक्षणाचे धडे गिरवत असताना हे घवघवीत यश मिवळलंय. फक्त राष्ट्रीय पातळीवर न थांबता सायली आता ऑलिम्पिकमध्येही कमाल करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे.

सायली कोळशेवाडी परिसरातील गणेश विद्यालयात आठवीत शिकतेय. तिला लहान पणापासूनच कराटेची आवड असल्यानं पहिलीत असल्यापासूनच सायली तायक्वांडोचं प्रक्षिक्षण घेतेय. सायलीनं शालेय पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक मेडल्स मिळवली आहेत. सायलीचे वडील उमेश घुगे हे दोन्ही पायांनी अधू असून ते अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय करतात. आपल्या अपंग आणि गरीबीवर मात करत त्यांनी आतापर्यंत सायलीला स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. मात्र, त्यांच्या मुलीच्या कर्तृत्वाची दखल घेतल्यामुळे त्यांनी प्रथम ‘झी २४ तास’चे आभार मानलेत तसेच शासकिय मदतीचीही त्यांना अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.

सायलीच्या या कर्तृत्वावर सायलीची आई वैशाली घुगे अतिशय भावूक झाली. त्याचप्रमाणे आपली मुलगी आज समाजात ताठ मानेनं जगेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

कोणत्याही क्षेत्रात अव्वल येण्याची महाराष्ट्रातील मुला-मुलींमध्ये पुरेपुर क्षमता आहे. योग्य संधी मिळाली तर ते त्या संधीचं सोनंही करुन दाखवतात. गरज असते ती फक्त त्यांना आधार आणि विश्वास देण्याची... सायलीही त्यांच्यातीलच एक... आता तिच्या गुणवत्तेला गरज आहे ती योग्य प्रशिक्षणाची आणि मार्गदर्शनाची... आपल्या मेहनतीच्या जोरावर सायली यशाची शिखरं पादाक्रांत करण्यास सज्ज तर आहेच.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 20, 2013, 22:52


comments powered by Disqus