Last Updated: Sunday, December 4, 2011, 11:41
झी २४ तास वेब टीम, पुणे पुण्यातील २६व्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपियाच्या टेफेरी रेगासा याने पहिला क्रमांक पटकावला. तर केनियाच्या फिलेमोन रोटीच याने दुसरा क्रमांक आणि इथोपियाच्याच नेगाश अबेबे याने दोन सेकंदाच्या फरकाने तिसरा क्रमांक पटकावला.
तर महिलांच्या २१ किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये थीटु मुटावा हिने प्रथम क्रमांक मिळवला. एकूण सोळा विभागांमध्ये ही स्पर्धा पार पडली. पुणेकरांनी या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिला आणि बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड आणि वन मंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता फ्लॅग ऑफ करून स्पर्धा सुरु झाली. अबालवृद्ध अशा हौशी पुणेकरांनी या मॅरेथॉनला उपस्थिती लावली होती. नेहरू स्टेडियमवर स्पर्धेचा शेवट झाला.
स्त्री भ्रूणहत्या थांबवा हा संदेश या मॅरेथॉनमधून देण्यात आला. या मॅरेथॉनच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी पार पडले. दरवर्षीची पुणे मॅरेथॉन ही सेलिब्रेटीच्या उपस्थितीमुळे चर्चेची ठरते. मात्र यावर्षी कोणत्याही सिनेतारकांची उपस्थिती नव्हती. पण मराठी सिने तारका अमृता खानावीलकर, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, आदिनाथ कोठारे आदी उपस्थित होते.
दरवर्षी या स्पर्धेला लौकिक मिळावा यासाठी सुरेश कलमाडी प्रयत्नशील असत मात्र यंदा ते खुद्द जेलमध्ये असल्याने त्यांचा परिणाम नक्कीच मॅरेथॉन स्पर्धेवर झालेला दिसून येतो. कलमाडी यांच्या राजकीय वजनामुळे अनेक सेलिब्रिटी यांची उपस्थिती असे. यंदा मात्र सेलिब्रिटींची अजिबात रेलचेल दिसली नाही.
First Published: Sunday, December 4, 2011, 11:41