विश्वनाथन आनंदची हॅट्ट्रिक - Marathi News 24taas.com

विश्वनाथन आनंदची हॅट्ट्रिक

www.24taas.com, मॉस्को
 
भारताचा अव्वल चेस प्लेअर विश्वनाथन आनंदनं इस्त्रायलच्या बोरिस गेलफंडला पराभूत करत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचं अजिंक्यपद पटकावलं. टायब्रेकरमध्ये आनंदनं गेलफंडला पराभूत केलं. या विजेतेपदासह आनंदनं आपल्या टेस करिरमध्ये पाचव्यांदा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली. या आधी आनंदनं 2000, 2007, 2008 आणि 2010 मध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली होती. त्याचप्रमाणे सलग तिस-यांदा विजेतेपद पटकावण्याची किमयाही साधली आहे.
 
वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये विश्वनाथन आनंद आणि इस्त्रायलच्या बोरिस गेलफंड यांच्यातील 12 वा गेम बरोबरीत सुटला होता. त्यामुळे दोघांचेही प्रत्येकी 6 पॉईंट्स झाले होते. शेवटचा गेम बरोबीरत सुटल्यानं वर्ल्ड चॅम्पियनशिपचा निर्णय हा टायब्रेकरमध्ये झाला. या टायब्रेकरमध्ये आनंदला अडीच गुण मिळवणे आवश्यक होते. टायब्रेकरही बरोबरीत सुटला असता तर ब्लिट्झ पद्धतीनं दोन गेम खेळवण्यात आले असते.
 
दरम्यान, या चॅम्पियनशिपमधील 10 गेम बरोबरीत सुटले. तर प्रत्येकी एकेक गेम आनंद आणि गेलफंडनं जिंकला. आनंदनं आठवा गेम तर गेलफंडनं सातव्या गेममध्ये विजय मिळवला होता. आनंद वर्ल्ड चेस रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे तर गेलफंड 20 व्या स्थानावर आहे. त्यामुळे गेलफंडनं आनंदला रोखल्यामुळे सा-यांनाच आश्चर्याच धक्का बसला होता. गेलफंडला पराभूत करत आनंद विजेतेपदाची हॅटट्रिक करत पुन्हा एकदा 64 घरांचा राजा ठरला आहे.

First Published: Wednesday, May 30, 2012, 21:40


comments powered by Disqus