स्पेननं आयर्लंडला अक्षरश: चारली धूळ... - Marathi News 24taas.com

स्पेननं आयर्लंडला अक्षरश: चारली धूळ...

www.24taas.com,
 
गतविजेत्या स्पेनने लीगमधील पहिल्या विजयाची नोंद केलीय. ग्रुप सीमध्ये दुबळ्या आयर्लंडवर स्पेनने ४-० ने विजय मिळवत ग्रुपमध्ये अव्वल स्थान काबिज केलंय. स्ट्रायकर फर्नांडो टोरेस स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
 
युरोचे गतविजेते आणि वर्ल्ड कप विजेत्या स्पेनने दुबळ्या आयर्लंडचा धुव्वा उडवला. स्पेनने आयर्लंडचा ४-० ने पराभव केला. ज्याच्याकडून सर्वाधिक आशा होत्या त्या स्पॅनिअर्ड स्ट्रायकर फर्नांडो टोरेसने अपेक्षेप्रमाणे आपली भूमिका चोख बजावत दोन गोल केले. इटलीविरूद्धच्या मॅचमध्ये अखेरच्या पंधरा मिनिटांसाठीच मैदानावर उतरलेला टोरेस या मॅचमध्ये सुरूवातीपासून मैदानावर दिसला. त्याने मॅचच्या चौथ्याच मिनिटाला गोल करत स्पेनला खातं उघडून दिल. यानंतर दुस-या हाफमध्ये त्याने ७० व्या मिनिटाला गोल करत विजयात मोलाची भूमिका बजावली. शिवाय डेविड सिल्वाने ४९ व्या मिनिटाला तर सेस फॅब्रिगसने ८३ व्या मिनिटाला गोल केला. सुरूवातीपासून मॅचवर पकड घट्ट केलेल्या स्पेनने शेवटपर्यंत मॅचमध्ये आपला दबदबा कायम राखला.
 
पहिल्या हाफमध्ये तर जवळपास स्पेननेच  बॉलवर आपल नियंत्रण ठेवलं होत. पूर्ण मॅचमध्ये केवळ एक-दोन वेळाच आयर्लंडने प्रतिहल्ला करत स्पेनच्या गोलपोस्टवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र बलाढ्य स्पेनसमोर आयर्लंडचं काही एक चाललं नाही. आयर्लंडला अखेरपर्यंत एकही गोल करता आला नाही. या पराभवामुळे आयर्लंडचं युरो कपमधील आव्हान संपुष्टात आलंय. तर आयर्लंडवर एकतर्फी विजय मिळवल्याने स्पेन क्वार्टर फायनलपासून केवळ एक पाऊल दूर आहे. याचबरोबर पॉईंट्स टेबलमध्येही स्पेनने आघाडी घेतली असून क्रोएशियाला मागे टाकले आहे.
 
.

First Published: Friday, June 15, 2012, 07:49


comments powered by Disqus