पेसने माझ्या पाठीत खंजीर खुपसला- भूपती - Marathi News 24taas.com

पेसने माझ्या पाठीत खंजीर खुपसला- भूपती

www.24taas.com, मुंबई
 
लिएंडर पेस आणि महेश भूपती या भारताच्या ऑल टाईम ग्रेट टेनिस जोडीनं लंडन ऑलिंपिकमध्ये एकत्र खेळावं असा निर्णय भारतीय टेनिस महासंघानं घेतला आहे. मात्र, भूपती पेसबरोबर खेळण्यास तयार नाही. 'पेसने माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे'. असं खळबळजनक वक्तव्य भूपतीने केलं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यातच कोणत्याही टेनिसपटूनं एखाद्या टेनिसपटूबरोबर खेळण्यास नकार दिल्यास त्याच्यावर करावाई केली जाईल असा पवित्रा टेनिस महासंघानं घेतला आहे.
 
लिएंडर पेस आणि महेश भूपतीनं भारताला टेनिसमध्ये अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. इंडियन एक्सप्रेस म्हणून टेनिसविश्वात ओळखल्या जाणा-या या टेनिसपटूंमध्ये मात्र वादाची ठिणगी पडली. आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एकमेकांविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेणा-या या टेनिसपटूंना मात्र, आगामी लंडन ऑलिंपिकमध्ये एकत्र खेळाव लागणार आहे. भारतीय टेनिस महासंघानं ऑलिंपिकमध्ये लिएंडर पेस आणि महेश भूपती ही एकच टीम पाठवण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय टेनिस महासंघानं या दोघांना एकत्र खेळण्यास सांगितलं असलं तरी, महेश भूपतीनं महासंघाला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
 
लिएंडर पेसबरोबर जोडी बनवल्यानंतर आम्ही जवळपास चार वेळा विभक्त झालो होतो. मात्र, चारही ऑलिंपिकमध्ये आम्ही देशाचं प्रतिनिधित्व केलं. गेल्या सीझनमध्ये पेसनं माझ्याबरोबर न खेळण्याचा निर्णय घेतला. आता, आमच्यामध्ये ताळमेळही नाही. त्यामुळे ऑलिंपिकमध्ये पुन्हा एकत्र खेळणं देशाचं हिताचं ठरणार नाही.
 
महेश भूपतीनं पेसबरोबर खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. 21 जून ऑलिंपिकसाठी टीम पाठवण्याची अंतिम तारीख आहे. तो पर्यंत हा वाद मिटवणं गरजेचं आहे. दरम्यान, पेस आणि भूपतीच्या वादामध्ये भारतीय टेनिसचं नुकसानं होतंय ही बाबही नाकारता येणार नाही.
 
 
 

First Published: Saturday, June 16, 2012, 16:26


comments powered by Disqus