युक्रेनवर कुरघोडी करत इंग्लंड टॉप पोझिशनवर - Marathi News 24taas.com

युक्रेनवर कुरघोडी करत इंग्लंड टॉप पोझिशनवर

www.24taas.com, युक्रेन
 
इंग्लंड विरूद्ध युक्रेन यांच्यात झालेल्या नाट्यपूर्ण मॅचमध्ये इंग्लंडने वेन रूनीने केलेल्या गोलच्या जोरावर, यजमान युक्रेनचा १-० ने पराभव करत ग्रुप डी पॉईंट टेबलमध्ये टॉप पोझिशनवर कब्जा केला. या विजयामुळे क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडपुढे आव्हान असणार आहे ते इटलीचं.
 
इंग्लंड विरूद्ध युक्रेन यांच्यातल्या मॅचचा प्रत्येक क्षण हा उत्कंठावर्धक ठरला. अनेक नाट्यमय घडामोडींनी पार पडलेल्या या मॅचमध्ये अखेर इंग्लंडने युक्रेनचा पराभव करत लीगमधील सलग दुस-या विजयाची नोंद केली आणि ग्रुपमध्ये टॉप पोझिशनही मिळवली. मॅचच्या पहिल्याच मिनिटांपासून यजमान युक्रेनने इंग्लंडच्या गोलपोस्टवर हल्ल्यांचा रतीब घालत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. त्यामुळे आतापर्यंत लीगमध्ये गचाळ डिफेंस करणा-या इंग्लंडचा युक्रेनविरूद्ध कस लागला. युक्रेनच्या आक्रमणापुढे इंग्लिश टीम बॅकफूटवर गेली होती. फर्स्ट हाफमध्ये तर इंग्लंड टीम केवळ नशिब बलवत्तर म्हणून युक्रेनविरूद्ध गोलशून्य बरोबरीत होती.
 
पण, अखेर सेकंड हाफमध्ये इंग्लंडने दडपण झुगारून देत आक्रमणावर भर दिला आणि मॅचच्या ४८ व्या मिनिटाला वेन रूनीने हेडरद्वारे गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. कॅप्टन स्टिव्हन जेरार्डने मारलेल्या क्रॉस पासने युक्रेनियन गोलकीपर पियाटोव्हला चकवलं आणि रूनीने संधी साधत गोल केला. बंदीनंतर वेन रूनी पहिल्यांदाच युरो कपच्या लीग मॅचमध्ये इंग्लंडकडून खेळत होता. पिछाडीवर पडलेल्या युक्रेनने नंतर पुन्हा एकदा आक्रमणावर अधिकाधिक भर देत इंग्लिश गोलपोस्टवर आक्रमणाचा पाऊसच पाडला. पण इंग्लिश डिफेंसने तितक्याच तोडीचा खेळ करत युक्रेनचे आक्रमण थोपवलं. मॅचच्या ६२व्या मिनिटाला युक्रेनला मॅचमध्ये बरोबरी करण्याची नामी संधी चालून आली होती. युक्रेनियन स्ट्रायकर मार्को डेविचने इंग्लिश गोलकीपर हार्टला चकवत बॉल गोलपोस्टच्या दिशेने मारला खरा. मात्र, डिफेंडर जॉन टेरीने चपळाईने गोलपोस्टमध्ये चाललेल्या बॉलला बाहेरच्या दिशेने किक मारली आणि इंग्लंडने आघाडी कायम केली. जसजशी मॅच फुलटाईमकडे सरकायला लागली तसतसा दोन्ही टीम्सच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांना अधिकाधिक वेग आला. अखेर फुलटाईममध्ये इंग्लंडने युक्रेनचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये दिमाखात प्रवेश मिळवला. क्वार्टर फायनलमध्ये आता इंग्लंडसमोर आव्हान असणार आहे ते माजी युरो चॅम्पियन इटलीचं.
 
.

First Published: Wednesday, June 20, 2012, 09:18


comments powered by Disqus