Last Updated: Thursday, June 21, 2012, 19:56
www.24taas.com, नवी दिल्लीटेनिसमध्ये मानापमानची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कमी रँकिंग असलेला जोडीदार दिल्याने टेनिसपटू लिअँडर पेसने लंडन ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. ऑल इंडिया टेनिस फेडरेशनने घेतलेल्या निर्णयावर नाराज होत पेसने हा निर्णय घेतला आहे.
लंडन ऑलिम्पिकसाठी पुरुष दुहेरीत पेसच्या साथीला विष्णूवर्धनची निवड करण्यात आली होती. तर भूपतीच्या साथीला रोहन बोपण्णाची निवड आयटाने केली होती. पण जागतिक रँकिंगमध्ये तळाशी असलेल्या एखाद्या खेळाडूच्या साथीने लंडन ऑलिम्पिकमध्ये उतरण्याच्या पर्यायाला पेस राजी नव्हता. त्यामुळे प्रसंगी तो ऑलिम्पिकमधून माघार घेईल असंही म्हटलं जात होतं. आणि अखेर पेसने ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
याआधी आयटाने लंडन ऑलिम्पिकच्या पुरुष दुहेरीसाठी पेसच्या साथीने महेश भूपतीची निवड केली होती. पण पेस आणि भूपती या दोघांमधला वाद विकोपाला गेला आहे. भूपतीने पेसच्या साथीने खेळण्यास नकार तर दिलाच, पण ऑलिम्पिकमध्ये तो आणि रोहन बोपण्णा या दोघांनीही आपण केवळ एकमेकांच्या साथीनंच खेळू असा पवित्रा घेतला होता.
या परिस्थितीत पेसचा जोडीदार म्हणून विष्णुवर्धनचं नाव पुढं आलं होतं. पण लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळेन तर महेश भूपती किंवा रोहन बोपण्णाच्या साथीनेच, असा रोखठोक बाणा पेसने ऑल इंडिया टेनिस असोसिएशनला पाठवलेल्या पत्रात व्यक्त केला होता.
First Published: Thursday, June 21, 2012, 19:56