Last Updated: Friday, June 29, 2012, 08:07
www.24taas.com, विजेतेपदाची प्रबळ दावेदार जर्मनीचा पराभव करत इटलीनं युरो कप फायनलमध्ये धडक मारलीय. इटलीनं जर्मनीचा २-१ नं पराभव केला. इटलीच्या विजयाचा हिरो ठरला तो मारियो बॅलोटेली. त्यानं दोन गोल करताना जर्मनीला परतीचं तिकिट दिलं. मॅच जिंकल्यावर इटालीयन प्लेअर्सनी एकच जल्लोष केला.
मारियो बॅलोटेलीनं लगावलेल्या या दोन शानदार गोल्समुळे इटलीने जर्मनीवर २-१ नं विजय मिळवत युरो कपची फायनल गाठलीय. सर्व अडथळ्यांना दूर करत जर्मन आर्मीचं आव्हान मोडून काढण्यात इटलीला यश आलंय. इटलीच्या या जबरदस्त विजयाचा शिल्पकार ठरला तो २१ वर्षाचा मारियो बॅलोटेली. इटलीकडून दोन्ही गोल्स या सुपर मारियोने केले आणि जर्मनीच्या फायनलमध्ये जाण्याच्या आशांवर पाणी फेरलं. इटलीच्या या विजयामुळे युरो कपच्या फायनलचं चित्र आता स्पष्ट झालंय. इटलीला फायनलमध्ये बलाढ्य स्पेनचा मुकाबला करावा लागणा आहे. मॅचच्या सुरवातीपासूनच इटालीयन प्लेअर्सनी आक्रमक पवित्रा घेतला होता. २० व्या मिनिटाला जर्मनीची फळी भेदण्यास मारियोला यश आलं आणि त्याने जबरदस्त हेडर लगावत इटलीकडून पहिला गोल केला. त्याच्या या शानदार गोलमुळे बलाढ्य जर्मनीच्या फायनल गाठण्याच्या स्वप्नास पहिला तडा गेला. जर्मनी पहिल्या धक्क्यातून बाहेर पडते न पडते तोच सुपर मारियो बॅलोटेलीनं ३६ व्या मिनिटाला दुसरा गोल लगावला आणि इटलीसाठी फायनलचा मार्ग मोकळा करुन दिला.
पहिल्याच हाफमध्ये लगातार दोन गोल लगावल्यामुळे इटलीच्या प्लेअर्सचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आणि त्यांना जर्मन आर्मीला रोखून धरण्यास यश आले. पण इतक्यातच पराभव स्विकारतील ते जर्मन कसले? ९० मिनिटं पूर्ण झाल्यावर चार मिनिटं खेळ वाढण्यात आला आणि त्यातच जर्मनीला एक पेनल्टी किक मिळाली. या मिळालेल्या संधीच सोन केलं ते मेसुत ओझिलनं. ओझिलन ९२ व्या मिनिटाला शानदार गोल लगावला मात्र जर्मनीला पराभवापासून दूर खेचण्यास तेवढा एक गोल पुरेसा नव्हता. अखेर युरो २०१२ मध्ये अपराजित राहिलेल्या जर्मनीचा अनेक आव्हानांना सामोऱ्या गेलेल्या इटलीनं २-१ नं पराभव केला आणि दिमाखात फायनल गाठली. आता फायनलमध्ये स्पेनविरुद्ध खेळताना इटलीकडून अशाच शानदार कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना असेल.
.
First Published: Friday, June 29, 2012, 08:07