मी अ'प्रामाणिक' नाही - पिंकी - Marathi News 24taas.com

मी अ'प्रामाणिक' नाही - पिंकी

www.24taas.com, कोलकाता
 
स्त्री नसून पुरुष असल्याचा आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या पिंकी प्रामाणिकला जामीन मिळालाय. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पिंकीनं तुरुंगात असताना आपल्याशी गैरवर्तवणूक करण्यात आल्याचा आरोप केलाय. तसंच आपल्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचंही तिनं म्हटलंय.
 
‘मी तुरुंगात असताना सतत रडत होती, लिंग परिक्षणासाठीही मी तयार नव्हते पण माझं कुणीही काहीच ऐकलं नाही. पोलिसांनी माझे हात-पाय बांधून मला लिंग परिक्षणासाठी खाजगी नर्सिंग होममध्ये नेलं. मी विरोध केला पण काहीच उपयोग झाला नाही’ असा आरोप पिंकी  प्रामाणिकनं केला आहे. परिक्षणामध्ये पिंकीमध्ये पुरुषांमध्ये आढळणारे एक्स आणि वाय असे दोन्ही गुणसूत्र आढळले होते. बलात्काराच्या आरोपाबद्दल विचारलं असता, ‘मला या प्रकरणात गुंतवलं गेलंय. तक्रारकर्ती महिला माझ्या घरी काम करते. काही दिवसांपूर्वी तिनं माझ्याकडे पैसे मागितले होते. मी तिला पैसे दिले नाहीत म्हणून तीनं माझ्यावर खोटा आरोप केल्याचं’  पिंकीनं म्हटलंय.
 
एका विधवा महिलेनं ‘पिंकी पुरुष असून आपल्याला लग्नाचं वचन देऊन त्यानं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या आरोपाखाली पिंकीला १५ जूनपासून न्यायालयीन कोठडीत ठेवलं गेलं होतं. रणजी ट्रॉफी विजेता बंगाल क्रिकेट टीमचा कॅप्टन एस. बॅनर्जीसहित माजी २० खेळाडूंनी पिंकी पुराणिकला न्याय मिळण्यासाठी बुधवारी एका रॅलीचं आयोजन केलं होतं. या खेळाडूंचे पिंकीनं आभार मानलेत.
 
 

First Published: Thursday, July 12, 2012, 12:18


comments powered by Disqus