तमाम भारतीयांच्या नजरा 'सायना'वर... - Marathi News 24taas.com

तमाम भारतीयांच्या नजरा 'सायना'वर...

www.24taas.com, लंडन
सायना नेहवाल... बॅडमिंटनमधील चीनी दबदबा मोडीत काढत जागतिक स्तरावर स्वत:चं असं एक वेगळं स्थान सायनानं निर्माण केलंय. तिचं मिशन ऑलिम्पिक आजपासून सरु होतंय. ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांना तिच्याकडून मेडल्सच्या अपेक्षा आहेत.
 
भारताला ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त अपेक्षा असणार ती सायना नेहवालकडून... जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या सायनानं आपल्या जबरदस्त कामगिरीनं मोठी झेप घेतलीय आणि तिनं एकटीनं बॅटमिंटनमधील चीनी दबदबा मोडीत काढलाय. सध्या सायना सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. सायनानं यावर्षात आतापर्यंत तीन सुपर सीरिज आपल्या नावावर केल्यात. स्विस ओपन, इंडोनेशियन ओपन आणि थायलंड ओपन या सुपर सीरिजचं विजेतेपद सायनानं पटकावलं. तर यापूर्वीही तिनं मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकावलाय. दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल,  पाच सुपर सीरिजचं विजेतेपद, चार ग्रांप्री अजिंक्यपदं आणि ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप सायनानं जिंकलीय.
 
सायनानं बीजिंगमध्ये ऑलिम्पिकमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं. मात्र, तिचा सफर क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात आला. असं असलं तरी गेल्या चार वर्षात बॅटमिंटनमध्ये तिनं चीनी ड्रॅगनंला एखहाती रोखलंय. सायनानं बॅडमिंटनमध्ये भारताला वेगळ्या उंचीवर तर नेऊनं ठेवलंच पण ग्लॅमरमध्येही तिनं भारतीय क्रिकेटर्सला मागे सोडलंय. आता लंडनमध्ये सायनाची घौडदौड कायम राहिली तर कोट्यावधी भारतीयांचं तिच्याकडून ऑलिम्पिक मेडलची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
.

First Published: Sunday, July 29, 2012, 09:19


comments powered by Disqus