प्रतिस्पर्धी नदालसारखाच हवा, फेडररचे उद्गार - Marathi News 24taas.com

प्रतिस्पर्धी नदालसारखाच हवा, फेडररचे उद्गार

Tag:  
झी २४ तास वेब टीम, न्यूयॉर्क
 
'रफाएल नदाल व नोवॅक जोकोविच या सध्याच्या पिढीच्या टेनिसपटूंविरुद्ध खेळणे आव्हानात्मकच. त्यांच्याविरुद्ध खेळताना खूप मजा येते. खास करून राफा नदाल माझा फेव्हरिट प्रतिस्पर्धी आहे. त्याच्यासारखा प्रतिस्पर्धी हवाहवासा वाटतो. तो खासच आहे. त्याच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ करावा लागतोच', हे उद्गार आहेत टेनिसपटू रॉजर फेडररचे. येत्या सोमवारी हा स्वित्झर्लंडचा खेळाडू तिसाव्या वर्षांत पदार्पण करतोय; पण २४, २५ वर्षांच्या तरुण खेळाडूंनाही तोडीची लढत देण्याची जिगर व फिटनेस फेडररकडे आहे हे विशेष.
 
गेल्या दोन वर्षांत ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्यांमध्ये वारंवार दिसणारे नदाल व जोकोविच यांनी आता टेनिसचा ताबा घ्यायला सुरुवात केलीय हे रॉजर मान्य करतो. जागतिक रँकिंगमधील तिसऱ्या क्रमांकाचा हा खेळाडू खिलाडूवृत्तीने म्हणतो, 'खूप यश मिळवले. ते राखण्यातही यशस्वी ठरतोय. तिशीत पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे, पण आजही जागतिक रँकिंगमधील तिसऱ्या क्रमांकावर आहे'.
 

२०१०मधील ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर फेडररला ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही, पण त्याने वेळोवेळी आपला ठसा उमटवला आहे. फ्रेंच ओपनमध्ये त्यानेच नोवॅक जोकोविचची ४१ सामन्यांनतर विजयी घोडदौड रोखली. विम्बल्डनमध्ये मात्र त्याने हातातोंडाशी आलेला विजय गमावला. दोन सेटच्या आघाडीवर असलेल्या फेडररला जो विलफ्रेंड सोंगाने नमवले. 'विम्बल्डनमधील सोंगाविरुद्धचा पराभव अनपेक्षितच होता, पण झाले ते झाले. त्याचा सतत विचार कशाला करायचा? आता पुढील सामन्यावर लक्षकेंद्रित करतोय. फिटनेस चोख आहे शिवाय विजयाची भूकही कमी झालेली नाही. अजून बरेच टेनिस शिल्लक आहे', असे फेडरर म्हणाला.
 

First Published: Sunday, October 9, 2011, 14:07


comments powered by Disqus