सानिया मिर्झा सातव्या स्थानावर - Marathi News 24taas.com

सानिया मिर्झा सातव्या स्थानावर


www.24taas.com , नवी दिल्ली
 
भारताची आघाडीची महिला खेळाडू सानिया मिर्झा  नव्या डब्ल्यूटीए मानांकनाच्या दुहेरी गटात कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट सातव्या स्थानावर पोचली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्यामुळे तिच्या मानांकात सुधारणा झाली आहे.
 
 
सानिया यापूर्वी ११व्या स्थानावर होती. तिने २१ जून २०१२ पर्यंत आघाडीच्या दहा खेळाडूंमधील आपले स्थान कायम राखले, तर लंडन ऑलिंपिकमध्ये तिला थेट प्रवेश मिळेल. दरम्यान, एकेरीच्या मानांकनात मात्र सानियाची घसरण झाली आहे. १०६ वरून ती १११व्या स्थानावर पोहोचली आहे. एकेरीत आघाडीच्या ६४ खेळाडूंना लंडन ऑलिंपिकमध्ये थेट प्रवेश मिळेल आणि जर सानिया यामध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरली, तरी अखिल भारतीय टेनिस संघटना तिच्यासाठी आयोजन समितीकडे वाईल्ड कार्ड प्रवेशाची मागणी करू शकेल, अशी परिस्थिती आहे.
 
 
झेक प्रजासत्ताकच्या रॅडेक स्टेपानेकच्या साथीत पुरूष दुहेरीचे विजेतेपद जिंकणारा आणि रशियाच्या एलेना व्हेस्नीनाच्या साथीत मिश्र दुहेरीतील उपविजेता लिअँडर पेस एटीपी दुहेरी मानांकनात सातव्या स्थानावर कायम आहे. रोहन बोपण्णा दुहेरीच्या यादीत ११ व्या स्थानावर आहे. त्याचा दुहेरीतील नवा साथीदार महेश भूपतीची मात्र आठ स्थानांनी घसरण झाली असून, तो १६ व्या स्थानावर पोचला आहे.   खांद्याच्या दुखापतीमुळे चेन्नई ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घेतलेला सोमदेव देववर्मनचे चार स्थानांनी नुकसान झाले. तो एटीपीच्या एकेरी मानांकनात ९० व्या स्थानावर आहे.

First Published: Tuesday, January 31, 2012, 10:48


comments powered by Disqus