हिंद केसरी हरीश्चंद्र बिराजदार यांचं निधन - Marathi News 24taas.com

हिंद केसरी हरीश्चंद्र बिराजदार यांचं निधन


झी 24 तास वेब टीम, पुणे
 
हिंद केसरी हरीश्चंद्र बिराजदार यांचं पुण्यात दीर्घ  आजाराने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर ४ महिने त्यांच्यावर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी त्यांनी रुस्तुम-ए-हिंद हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला होता.
 
पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीचे सर्वेसर्वा  महणून त्यांची ओळख होती. केंद्र सरकारचा ध्यानचंद पुरस्कार, राज्यसरकारचा दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने भारतीय कुस्तीविश्वाची मोठी हानी झाली आहे.
 
त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो तरुणांना कुस्तीची तालीम दिली. त्यांच्या तालमीत तयार झालेल्या अनेकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीला अजरामर केलं होतं. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, आंतरराष्ट्रीय मल्ल राहूल आवारे यांच्यासह ६ महाराष्ट्र केसरी त्यांनी घडवले. लातूर जिल्ह्यातील रामलिंग या मूळ गावातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

First Published: Sunday, October 2, 2011, 12:58


comments powered by Disqus