Last Updated: Wednesday, February 22, 2012, 12:04
www.24taas.com, कोल्हापूर 
कुस्तीमधली सर्वोच्च मानली जाणारी हिंदकेसरी स्पर्धा कोल्हापूरात होणार आहे. मात्र हिंदकेसरी कुस्तीसाठी महाराष्ट्रात तुल्यबळ मल्ल सापडत नाही. त्यामुळे हिंदकेसरीची गदा परराज्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तयारी नसल्यानं अनेक मल्ल मैदानात उतरण्यास तयार नाहीत तर महाराष्ट्रातील मल्ल चांगली लढत देतील अशी आशा कुस्ती प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या खासबाग कुस्ती मैदानाला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यंदाची हिंदकेसरी स्पर्धा कोल्हापुरात आयोजित करण्यात आली आहे. मात्र कुस्तीच्या या पंढरीत स्पर्धेसाठी प्रबळ दावेदारच नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र केसरीसह वेगवेगळी मैदानं मारणाऱ्या मल्लांनी या स्पर्धेपासून लांब राहणं पसंत केलं आहे.
तर पैलवानकीचा खर्च परवडत नसल्यानं महाराष्ट्रातील मल्लांचं आव्हान या स्पर्धेत नसल्याचं ज्येष्ठ कुस्तीगीर सांगात आहेत. सध्या तरी या स्पर्धेसाठी उत्तर भारतीय मल्लाच्या तोडीचा मल्ल मिळणं अवघड दिसत आहे. पण महाराष्ट्रातील मल्ल हिंदकेसरी स्पर्धेत चांगली लढत देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
First Published: Wednesday, February 22, 2012, 12:04