कबड्डीच्या मराठी सुवर्णकन्यांना १ कोटी - Marathi News 24taas.com

कबड्डीच्या मराठी सुवर्णकन्यांना १ कोटी

www.24taas.com, मुंबई

विश्वविजेत्या महिला कबड्डीपट्टूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे निर्णय आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
 
मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विश्वविजेत्या कबड्डीपट्टूंच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर यांना प्रत्येकी एक कोटीचे बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांचे प्रशिक्षक यांनाही २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचेही जाहीर करण्यात आले.
 
भारताच्या विश्वविजेत्या महिला टीममध्ये महाराष्ट्राच्या सुवर्णा बारटक्के,अभिलाषा म्हात्रे, दीपिका जोसेफ यांचा समावेश होता.  या महाराष्ट्राच्या तीन वर्ल्ड कप विजेत्या कबड्डीपटूंनी मंगळवारी उपमुख्यमंत्री दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यानी या सुवर्णकन्यांना बक्षीस देण्यासंदर्भातील एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले. मराठी मातीतल्या कबड्डीसारख्या खेळाला प्रोत्साहन द्या अशी भूमिका त्यांनी घेतली होती.  या पत्राचा विचार करून हे बक्षीस जाहीर करण्यात आला.
 
भारतीय महिला कबड्डी टीमचे मराठमोळे  कोच रमेश भेंडगिरी यांचाही २५ लाख रुपये देऊन गौरव करण्यात येणार आहे.
 
तसेच, सुवर्णा बारटक्के हिने सरकारी नोकरीसाठी असणाऱ्या साऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्यास तिला लगेच नोकरी देण्यात येईल असं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
 
दरम्यान दीपिका जोसेफ हिला एशियन कप जिंकल्यानंतर सरकारने क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी दिलेली आहे तर अभिलाषा ही रेल्वेमध्ये नोकरीला आहे.
 
भारतीय महिला कबड्डी टीमने पहिल्या-वहिल्या वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावलं होतं. फायनलमध्ये भारतीय महिला टीमने इराणला २५-१९ ने पराभूत करत वर्ल्ड कपच्या विजेतेपदाला गवसणी घातली होती.
 
ममता पुजारीच्या कॅप्टन्सीखालील भारतीय टीम या वर्ल्ड कपमध्ये एकाही मॅचमध्ये पराभूत झाली नाही. या वर्ल्ड चॅम्पियन टीममध्ये महाराष्ट्राकडून तीन खेळाडू सहभागी झाल्या होत्या. मुंबईची सुवर्णा बारटक्के, अभिलाषा म्हात्रे आणि पुण्याची दीपिका जोसेफ या तीन खेळाडू या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाल्या होत्या.

First Published: Wednesday, March 7, 2012, 18:31


comments powered by Disqus