Last Updated: Friday, November 11, 2011, 15:15
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभारामुळे तिरंदाजीच्या खेळाडूंना चक्क राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेलाच मुकावं लागलं. याचा निषेध करत युवा सेनेनं विद्यापीठात गोंधळ घातला आणि क्रीडा विभागाचे संचालक उत्तम केंद्रे यांना टॉयलेटमध्ये कोंडून ठेवलं. तसंच दमदाटी करत त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला. विद्यापीठाकडून पुन्हा असा प्रकार घडला तर मी नोकरी सोडीन असंही संचालकांकडून माफीनाम्यात लिहून घेतलं. तिरंदाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे धनुर्विद्या प्रकारात सात खेळाडू आणि एक संघ व्यवस्थापक हे पथक पंजाबमधल्या पतियाळा इथं रावाना झालं.
मात्र तिथे पोहोचल्यानंतर अर्ध्याहून अधिक स्पर्धा होऊन गेल्याचं पाहताच खेळाडूंना धक्काच बसला. याआधीही विद्यापीठानं तिकीटांच्या बाबतीतही असाच घोळ घातला. या स्पर्धकांचे तिकीटं कन्फर्म झाली नव्हती. विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या हेळसांडपणामुळे या खेळाडूंना दोन डब्यांमधल्या जागेत प्रवास करावा लागला तोही तिरंदाजीच्या महागड्या साहित्यासह. अशा भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच मनस्ताप भोगावा लागतो.
First Published: Friday, November 11, 2011, 15:15