फेडररचा नादालला सुपर बॅकहॅण्ड - Marathi News 24taas.com

फेडररचा नादालला सुपर बॅकहॅण्ड

झी २४ तास वेब टीम
 
एटीपी वर्ल्ड टूअर फायनल्स टूर्नामेंट ही टेनिस प्रेमींकरता एक पर्वणीच असते. आणि त्यातही स्विस रॉजर फेडरर विरूद्ध स्पॅनिआर्ड राफाएल नादाल मॅच म्हंटली की चाहत्यांकरता दुग्धशर्करा योगंच. एटीपी फायनल्सच्या मॅचमध्ये फेडररने राफालचा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवत टॉप फोरमध्ये स्थान पक्कं केलं. सेमी गाठण्याकरता आता नादालला त्सोंगाच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
 
लंडन येथे सुरू असलेल्या एटीपी वर्ल्ड टूअर फायनल टूर्नामेंटमध्ये मोठा उलटफेर झाला. जागतिक रँकिंगमध्ये चौथ्या पोझिशनवर असणाऱ्या रॉजर फेडररने सेकंड पोझिशनवर असणाऱ्या राफाएल नादालचा ६-३, ६-० अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत सेमीफायनलमधील आपलं स्थान निश्चित केलं. स्पॅनिआर्ड राफाल आणि स्विस फेडेक्सच्या या ड्रीम मॅचकरता प्रेक्षकांनी गर्दी केली होती. नदालला आता टॉप फोरमध्ये स्थान मिळवण्याकरता जो विल्फ्रेंड त्सोंगाशी होणाऱ्या मॅचमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. त्सोंगाने ग्रुप बीच्या मॅचमध्ये मार्डी फिशचा  ७-६, ६-१ ने पराभव केला.
 
होम क्राऊडसमोर खेळताना एँडी मेरेला डेव्हिड फेररकडून पहिल्या मॅचमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.मात्र दुखापतीमुळे त्याला उर्वरित टूर्नामेंटमधून माघार घ्यावी लागल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. याआधी फेडरर आणि नदाल यांच्यात झालेल्या मॅचेसमध्ये नदालने १७ वेळा बाजी मारली, तर फेडेक्सला केवळ ८च विजय मिळवता आले. पहिले पाच गेम्स फेडररने सहज जिंकले. फेडेक्सने केवळ ३२ मिनिटांतच पहिला सेट जिंकला. या मॅचमध्ये नदाल फेडेक्स समोर निष्प्रभ दिसत होता. आणि अखेर एका तासात फेडररने नदालचा पराभव केला.

First Published: Wednesday, November 23, 2011, 18:00


comments powered by Disqus